खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

चोरीला गेलेले 50 मोबाईल हस्तगत

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोली पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील लोकांचे मोबाईल बाजारात तसेच यात्रेत गहाळ झाले होते. मोबाईल चोरीली गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर खोपोली पोलिसांनी तांत्रिक सर्वकष वापरत महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून 8 लाख 50 हजार रूपये किमंतीचे 50 मोबाईल हस्तगत केले आहेत. तसेच संबंधित चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी (दि.12) तक्रारदारांना पोलिस ठाण्यात बोलावून मोबाईल परत करण्यात आले आहेत. तर खोपोली पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केले आहे.

मोबाईल चोरी संदर्भात खोपोली पोलिस ठाण्यात रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत व्हारंबळे, पो.ना.सागर शेवते, प्रदिप कुंभार, सतीश बांगर, प्रदीप खरात, देवकाते, राठोड आदि उपस्थित होते. यावेळी मोबाइल गहाळ किंवा चोरी झालेले मोबाईल तक्रारदारांना देण्यात आले.

सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरीकाच्या जिव्हाळयाची बाब असून मोबाईल फोन हे गरजेचे उपकरण झालेले आहे. तथापी बर्‍याचवेळा आपल्याकडून मोबाईल फोन कोठेतरी विसरणे, पडून गहाळ होणे अशा बाबी होत असतात. याबाबत खोपोली पोलीस ठाण्याकडे 2023 ते 2024 या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या दाखल झालेल्या तक्रारींचा पुन्हा एकदा नव्याने आढावा घेण्यात आला व एक सर्वकष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये गहाळ झालेले मोबाईल पुन्हा ट्रेस करण्यात आले आणि पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले 50 मोबाईल महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे 50 मोबाईल परत मिळविण्यात खोपोली पोलीसांना यश प्राप्त झाले.

यासाठी वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजीत व्हायरंबळे आणि अमोल राठोड यांनी धडाकेबाज कारवाई करीत 8 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 50 मोबाईल मिळविल्याबद्दल रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केले आहे.

Exit mobile version