। कलोन । वृत्तसंस्था ।
फिफाच्या जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमला युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत प्रारंभीच पराभवाचा धक्का बसला होता. मात्र, त्यातून सावरत त्यांनी शनिवारी रात्री रुमानियावर दोन गोलने चमकदार विजय मिळविला. परिणामी आता ङ्गईफ गटात चुरस वाढली आहे. बेल्जियमच्या विजयात युरी टेलेमान्स याने पूर्वार्धात व कर्णधार केविन द ब्रह्न याने उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल केला.
पहिल्या फेरीत बेल्जियमला स्लोव्हाकियाने धक्का दिला होता, तर रुमानियाने युक्रेनला पराजित केले होते. नंतर युक्रेनने स्लोव्हाकियास हरवून आव्हान कायम राखले. युरो करंडकाच्या इतिहासातील तिसर्या क्रमांकाचा सर्वांत वेगवान गोल युरी टेलेमान्स याने सामना सुरू झाल्यानंतर 73 व्या सेकंदास (1 मिनीट, 13 सेकंद) नोंदविला. रुमानियाच्या बचावफळीवर वारंवार दडपण आणलेल्या कर्णधार केविन द ब्रह्न याने 80 व्या मिनिटास बेल्जियमची आघाडी वाढविली. गोलरक्षक कोएन कॅस्टएल्स याने दुरवरून मारलेल्या फटक्यावर 32 वर्षीय द ब्रह्न याने चेंडू नियंत्रित केला आणि नंतर रुमानियाचा बचाव भेदला.