। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील नारंगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. वडगाव येथे आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नारंगी शाळेच्या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर लगोरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत शाळेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या स्पर्धेत 3 बीट पातळीवरील विद्यार्थी सहभागी झाले होते. वावोशी बीटने सर्वाधिक पारितोषिके मिळवून चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. तालुका गटशिक्षणाधिकारी चोरामले यांच्या हस्ते या चषकाचे वितरण करण्यात आले.
शालेय शिक्षण क्षेत्रासाठी हे यश प्रेरणादायी असून या यशामागे मुख्याध्यापिका शिल्पा पाटील, शिक्षक भागिनाथ पोटे, दीपक खाडे, नम्रता यादव व केंद्रप्रमुख संतोष पाटील यांचे अथक मार्गदर्शन आहे. तसेच, नारंगी शाळेने तालुकास्तरीय स्पर्धेत दिमाखदार विजय संपादन केल्याबद्दल सरपंच भारती आरावकर, उपसरपंच देवेंद्र देशमुख, ग्रामविकास अधिकारी गणेश मोरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना वाघुले व सदस्य, वासूदेव देशमुख, नरेंद्र गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून शाळेच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.