निमंत्रित 16 संघामध्ये होणार लढत; नव्या वर्षात क्रिकेट खेळाचा आनंद क्रीडाप्रेमींना मिळणार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 नाईट टेनिस क्रिकेट लीग क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा 9 ते 11 जानेवारीला तीन दिवस अलिबागमध्ये रंगणार आहे. अलिबागजवळील कुरूळ येथील क्षात्रैक्य माळी समाज सभागृहात शुक्रवारी (दि.27) चषकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते झाले.
यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, अॅड. निता पाटील, नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना कीर, अशोक प्रधान, अक्षय्या नाईक, अश्वीन लालन, महेश पाटील, प्रकाश राठोड, कपील खरवडकर, आदी मान्यवर, संघ मालक, संघाचे व्यवस्थापक, कर्णधार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत निमंत्रित 16 संघ आहेत. त्यामध्ये साखरमधील प्रदिप स्पोर्ट्स, नाखवा वॉटर स्पोर्टस्, प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्ट्स, अलिबागमधील यु.व्ही. स्पोर्ट्स, ए.बी. ग्रुप, कुबेर इलेव्हन, आर्यन स्ट्रायकर्स, जे.डी. भार्गवी इलेव्हन, फैझी इलेव्हन, नवगांवमधील रियांश इलेव्हन, वरसोली येथील त्रिश्राव्या इलेव्हन, आंबेपूरमधील एस.पी. सुपर प्लेअर्स, म्हात्रोळी येथील आद्य सप्लाअर्स, थळमधील एम.डी.वॉरिअर्स, नागाव येथील सिया वॉरिअर्स, दिघोडीमधील अर्जून इलेव्हन या संघाचा समावेश आहे. नव्या 2025 वर्षाच्या सुरुवातीला अलिबागमध्ये क्रिडाभवन येथे 9 ते 11 जानेवारी अशी तीन दिवस स्पर्धा होणार आहे.
अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून स्पर्धेचे हे दुसरे पर्व असणार आहे. अलिबाग तालुका मर्यादीत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला 2 लाख रुपये व चषक, द्वीतीय क्रमांकाला 1 लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेत्या व उपविजेत्या संघाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा प्रो-लिंक स्पोर्ट्स व एफएच स्पोर्ट्सवरदेखील घरबसल्या पाहता येणार आहे.