मांडव्याच्या आखाड्यात रंगल्या चटकदार कुस्त्या

नामवंत मल्लांचा समावेश

| अलिबाग | प्रतिनिधी |

सुमारे दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या अलिबाग तालुक्यातील मांडवा समुद्रकिनारी असलेल्या आखाड्यात चटकदार कुस्त्या रंगल्या. मल्लांचा कावेबाजपणा, जिद्दीने जिंकण्याची अशा हे चित्र पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मांडवा ग्रामस्थ, आणि टाकादेवी क्रीडा मंडळ मांडवा यांच्यावतीने बुधवार (दि.30) रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्रकिनारी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राजकिय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, ग्रामस्थ व कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उद्घाटनीय कुस्ती सामना ठाणे जिल्ह्यातील चौधरपाडा येथील मल्ल पवन चौधरी व नाशिक जिल्ह्यातील गोपाळ कडनोर या दोन मल्लांमध्ये झाला. भरदार शरीरयष्टी असलेल्या या दोन मल्लांमध्ये चुरशीची लढत झाली. एकमेकांना ते पाडून विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु एकमेकांना शेरास सव्वाशेर अशा पध्दतीने दोघांची लढत सुरू होती. प्रेक्षकही या दोघांच्या कुस्तीकडे टक लावून पाहत होते. वेगवेगळ्या प्रकारचा कावेबाज करीत दोघेही एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र विजय कोणीच मिळवू शकला नाही. ही लढत समांतर झाल्याने पंचाने घोषित केले. तसेच दुसरी कुस्तीची लढत ठाणे जिल्ह्यातील चौधरपाडा येथील तेजस भंडारी व रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील हेरंब देशमुख यांच्यात झाली. कित्येक वेळ दोघांमध्ये चुरस सुरु होती. अखेर नाशिकच्या तेजस मल्लाने वेगळ्या शैलीत खोपोलीतील मल्लाला पाडून ठाणेच्या आखाड्यात विजयाचा शिक्का मोर्तब केला. लहान मुलांमध्ये मांडवा येथील अश्लेष पाटील व आंदोशी येथील पारस चेरकर या दोन मल्लांमध्ये कुस्ती झाली. त्यात मांडव्याचा अश्लेष पाटील विजयी ठरला. या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींनी अलोट गर्दी केली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुस्ती पाहण्याचा एक वेगळा आनंद, उत्साह दिसून आला.

500 मल्लांचा सहभाग
अलिबाग तालुक्यातील मांडवा ग्रामस्थ, आणि टाकादेवी क्रीडा मंडळ मांडवा यांच्यावतीने कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या. या कुस्ती स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, आंदोशीसह कोल्हापूर, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली जिल्ह्यातील 15 हून अधिक आखाड्यांनी सहभाग घेतला होता. सुमारे 500 मल्ल कुस्ती खेळण्यासाठी आले होते. ज्या आखाड्यातील मल्ल जास्त जिंकतील त्या आखाड्याला प्रथम क्रमांकाचे चॅम्पीयन चषक व रोख पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वीतीय क्रमांकाला तीन हजार रुपये व चषक तसेच तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
Exit mobile version