युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना सुखरुप आणा; पालकांची जिल्हा प्रशासनाला साद

29 विद्यार्थ्यांचे पालक संपर्कात
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शिक्षणासाठी गेलेल्या व काळजाचा तुकडा असलेली आपली मुले युक्रेनमध्ये अडकल्याने रायगडातील पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. आपल्या पाल्यांना सुखरुप घरी परत आणण्याची विनंती पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठविली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली. कृषीवल तेथील काही मुलांशी संपर्कात असून, मुलांनी आपल्याला तयारीत राहण्यासाठी सांगण्यात आले असून, कधीही परत नेण्यासाठी येतील. आम्ही ठिक आहोत, असे काही मुलांनी सांगितले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली आहे. मात्र, हवाई उड्डाण बंद असल्याने सर्वजण चिंतेत आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या आपल्या नातेवाईकांची यादी मागविली होती. त्यानुसार पनवेल 8, पेण 5, खालापूर 4, महाड 3, कर्जत 2 तर तळा, अलिबाग आणि रोहा येथील प्रत्येकी 1 तसेच मुंबईतील 3 विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधत मदतीची मागणी केली होती.

पेणचे पाच विद्यार्थी संपर्कात
| पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी पाच विद्यार्थी युक्रेनच्या विविध भागात अडकले आहेत. आर्यन राजेंद्र पाटील, कोमल नंदकुमार पाटील, श्रद्धा किशोर पाटील, प्रेरणा दिघे आणि कल्पित मढवी अशी या विद्यार्थ्यांची नावे आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडली आहे. त्यांचे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, त्यामुळे पालकवर्ग खूप चिंतेत आहेत. आपली मुले मायदेशी परत यावी यासाठी भारत सरकारकडे त्यांना सुखरुप आणण्याची मागणी करीत आहेत. परंतु, सध्याची युक्रेनची स्थिती पाहता, परिस्थिती खूप गंभीर असल्याने या विद्यार्थ्यांना परत आणण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत; परंतु जिल्हा प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

युक्रेनमध्ये परिस्थिती गंभीर – नंदकुमार पाटील
कोमलचे वडील नंदकुमार पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, दहा मिनिटांपूर्वीच माझे कोमलशी बोलणे झाले आहे. ती ज्या ठिकाणी हॉस्टेलला आहे, त्या ठिकाणची परिस्थिती खूप गंभीर असून, केव्हाही काहीही होऊ शकते. सध्या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये एकत्र आणले आहेत. तेथे वातावरण भयमय आहे, असेही कोमलने सांगितले. आमच्या पाल्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी विनंती मायबाप सरकारला आहे.

माझा मुलगा सुरक्षित आहे – राजेंद्र पाटील
आर्यनचे वडील राजेंद्र पाटील यांच्याशीदेखील दूरध्वनीवरुन संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, मी आर्यनच्या संपर्कात असून, तो सुरक्षित आहे. त्याचे माझे बोलणे सुरु आहे, तसेच लवकरात लवकर शासनाने योग्य ती पावले उचलून विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे.

महाडचे तिघे सुखरुप
| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील तीन विद्यार्थी युके्रनमध्ये अडकले असून, ते सुखरुप असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे. तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. एजाज बिरादार यांचा मुलगा खुर्रम एजाज बिरादार, तर भाचा शोएब मौलासाब पठाण आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे यांची मुलगी मुग्धा पद्माकर मोरे हे तिघेही महाविद्यालयाच्या बंकरमध्ये सुखरुप असून, व्हिडीओ कॉलिंगद्वारे पालकांशी संपर्कामध्ये असल्याची माहिती देण्यात आली. युके्रनमधून बाहेर पडणार्‍यांची संख्या अधिक असल्याने बॉर्डरजवळ पोलंडमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. अद्याप विमान उपलब्ध नसल्याने विद्यार्थी भारतामध्ये येऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version