रायगडचे सहा विद्यार्थी युक्रेनमधून परतले
आतापर्यंत 10 जणांची देशवापसी
। अलिबाग । भारत रांजणकर ।
रशियन सैन्याकडून हल्ला सुरु झाल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थ्यांपैकी आज सहा विद्यार्थी सुखरुप परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देशवापसी झालेल्या विद्यार्थ्यांची एकुण संख्या 10 झाली आहे. तर 22 विद्यार्थी अजूनही युक्रेनमधील विवीध शहरात अडकून पडले आहेत. रशियाच्या बॉर्डर जवळ असलेल्या आणि सातत्याने बॉम्ब ग्रेनेड हल्ले होत असलेल्या धोकादायक ठरलेल्या खारकीव्हमध्ये अडकून पडलेले जिल्ह्यातील पाच विद्यार्थी देखील सुखरुपपणे खारकिवमधून बाहेर पडले असून आता ते रशियन बॉर्डर जवळ पोहचले आहेत. त्यामुळे या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी जोपर्यंत सुखरुपणे घरी येत नाही तोपर्यंतची चिंता मात्र कायम आहे.
आज रायगडला आपापल्या घरी सुररुप परत आलेल्यांमध्ये ओडेसा येथून अभिजित थोरात, खोपोली यश काळबेरे, तळा, मोहम्मद शेख, विन्नित्सा येथून प्रेरणा दिघे, पेण, अद्वैत गाडे, पनवेल, अनुजा जायले, कर्जत यांचा समावेश आहे. तसेच यापूर्वी विन्नित्सा येथून आर्यन राजेंद्र पाटील, झिराड आळी, पेण, पुर्वा पराग पाटील, धेरंड ता. अलिबाग, तर ओडेसा येथून साल्वा मोहम्मद सलीम धनसे, खोपोली, इवानो येथून प्राची दिपक पवार करंजाडे, पनवेल हे सुखरुप घरी पोहचले आहेत.
डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले रायगडातील 32 विद्यार्थी हे युक्रेनच्या विविध भागात अडकले होते. त्यापैकी दहा विद्यार्थी परतले असले तरी 22 अजूनही परत येण्याच्या मार्गात आहेत. रायगडातील अलिबाग, महाड, पेण, तळा, माणगाव, खोपोली, पनवेल, तळा या तालुक्यातील विद्यार्थी अडकले होते. मार्गात असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 7 जण बुडापेस्त, 2 लवीव, सुमे 1, सोल्वाकीया 2, तर रोमानिया 8, रशिया सिमारेषेवर 1 असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.







