| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आवास जिल्हा परिषद मतदार संघात विचित्र कारभार चालत आहे. कार्पोरेट खोती पद्धत चालविली जात आहे. भूमीपुत्रांच्या जमिनी विकल्या जात आहेत. लँड डिलिंग करून अनेक भाग विकण्याचा धंदा चालविला जात आहे. हा प्रकार रोखला नाही, तर आगामी काळात गावांची ओळख दिसणार नाही, अशी घणाघाती टीका शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली. विधानसभा निवडणुकीत एकमेकांना शिव्या देणारे आज त्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवत आहेत. त्यामुळे हा बदला घ्यायचा आहे. शिव्याशाप देणाऱ्या महिलेला जिजाऊंच्या नावाने पुरस्कार दिला जातो. ही मोठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे कुठे ठेवले आहे राजकारण, असा प्रश्न कायमच पडत आहे. यावेळी परिवर्तन निश्चितच होणार. हा मतदारसंघ काँग्रेस व शेकापचा आहे. पुढची पिढी घडविण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांना निवडून द्या. दिलीप भोईर यांचे डिपॉझीट जप्त झाले पाहिजे, अशा पद्धतीने सर्वांनी ताकदीशी काम करा. जनतेचे राज्य शिवतीर्थावर पोहोचवा, हीच खरी दिवंगत मधुकर ठाकूर अर्थात पप्पांना श्रद्धांजली असेल, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.





