| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरीतील ब्रिटिशकालीन प्रादेशिक मनोरुग्णालयाला तब्बल 138 वर्षांनंतर भारतीय ओळख मिळणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात तब्बल 25 वॉर्डच्या नवीन इमारती उभ्या राहणार आहेत. गेल्या 138 वर्षात मनोरुग्णालयाच्या आवारातील वॉर्डवरील कौले बदलण्यात आली होती. पत्र्याची छपरे तर गंजली आहेत. हे मनोरुग्णालय सुसज्ज करून देण्यासाठी आरोग्य विभागाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुमारे 9 कोटी 87 लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बनवण्यात आले आहे.
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हे ब्रिटिशकालीन म्हणजे 1886 सालातील असून याठिकाणी महिला मनोरुग्णांसाठी मनीषा, मनाली, मालती, मोहिनी, मानसी नावाचे कक्ष आहेत. याचबरोबर महिलांसाठी न्यायबंदी कक्ष, कोठडी, भोजनगृह तर पुरुष मनोरुग्णांसाठी आकाश, आदर्श, आनंद कक्ष, पुरुष रुग्णांसाठी कोठडी, भोजनगृह अशा अनेक इमारती आहेत. यापूर्वीच येथे बाह्यरुग्ण विभागाची इमारत उभारून घेतली आहे. वैद्यकीय अधीक्षकांची इमारतसुद्धा जीर्ण झाली असून, छपरावरील पत्रेही गंजले आहेत. यातील अनेक वॉर्ड इमारतींवरील पत्रे पावसाळ्यात गळत आहेत.
या प्रादेशिक मनोरुग्णालयात कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबईसह स्थानिक रुग्णांना उपचार दिले जातात. ठाणे, पुणे येथे मनोरुग्णालये असूनही रत्नागिरीतील उपचार चांगले असल्याने याठिकाणचे रुग्णही येथे आणले जातात. अनेक रुग्णांना ॲडमीट करून घ्यावे लागते. रोज सुमारे 175 बाह्यरुग्णांची तपासणी होऊन वैद्यकीय उपचार दिले जातात. अशा या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या दैनावस्थेकडे 138 वर्षात कोणाचे लक्ष गेले नव्हते.
रस्त्यांचेही नूतनीकरण
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाचा आवार फारच निसर्गरम्य आहे. याठिकाणचे 900 मीटर लांबीचे रस्तेही केले जाणार आहेत. आवाराभोवतीची सुरक्षाभिंतीचेसुद्धा नूतनीकरण होणार आहे. या भिंतीची लांबी 450 मीटर इतकी आहे.