। महाड । वार्ताहर ।
काही दिवसांपासून महाड तालुक्यामध्ये पावसाने दडी मारली असून मोठ्या प्रमाणात ऊन पडत असल्याने भात शेती संकटात सापडली आहे. महाड तालुक्यामधील भात शेतीवर खोड किड्याचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाने केलेल्या कीड रोड सर्वेक्षण अंतर्गत दिसून आले आहे. शेतकर्यांनी या खोडकिड्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
एका बाजूला महाड तालुक्यामध्ये भात शेतीचे क्षेत्र घटत असतानाच दुसरीकडे मात्र लहरी हवामानाचा फटका देखील भात पिकाला बसत आहेत. गेले काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे तर काही वेळा तुरळत पाऊस पडत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात ऊन पडू लागल्याने शेतातील पाण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. बदलत्या हवामानामुळे भात पीक धोक्यात येऊ शकते म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शेती विभागाकडून कीड रोग सर्वेक्षण अंतर्गत महाड तालुक्यातील विविध भागात सर्वेक्षण करण्यात आले आहे. महाड तालुक्यात कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र रोह्याचे प्राध्यापक जीवन आरेकर, महाड कृषी पर्यवेक्षक किरण कोकरे व त्यांच्या समवेत दत्तात्रय नरुटे, पल्लवी कानडे, अनुसया बडे, मुग्धा पिंजरकर, बजरंग दाबेकर यांनी संयुक्तपणे चांढवे खुर्द, कांबळे तर्फे महाड, आकले, वडवली, कोलआणि दासगाव या गावांमध्ये कीड रोग सर्वेक्षण पाहणी केली. यावेळी त्यांना भातावरील पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. कृषी विभागाने याबाबत शेतकर्यांना उपाययोजना ही सुचविल्या आहेत.
भात पीक कापणीनंतर हा किडा कोषा अवस्थेत राहतो. दुसर्या वर्षाच्या पेरणीनंतर पोषक वातावरण मिळाल्यानंतर यामधून पतंग बाहेर पडून साधारणतः तो किडा दीडशे ते दोनशे अंडी घालून अळ्या तयार झाल्यानंतर भाताच्या खोडात जाऊन कोंब खाण्यास सुरवात करतात. भात वाढीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास भाताचे मधले पाते पिवळे, लालसर होऊन त्यांची सुरळी होते. याचा भात पिकावर परिणाम होतो. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता क्विनॉलफॉस 2 मिली प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फिप्रोनील 0.3% दाणेदार कीटकनाशक 208 ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वाळूमध्ये किंवा युरिया खतामध्ये मिश्रण करून भात शेतीमध्ये वापरावे. असे आवाहन जीवन आरेकर यांनी केले.