धक्कादायक! सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला

डोक्यात कोयत्याचे घाव, आरोपी मोकाटच?
गंभीर जखमी असूनही साधारण दुखापतीचा अहवाल?

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आक्षीमध्ये सख्ख्या भावानेच आपल्या भावावर भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून, डोक्यावर धारदार कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आलेल्या वयोवृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, हल्ल्यानंतर वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नंदकुमार गोपळ राणे असे जखमी वयोवृद्धाचे नाव असून, ते आक्षी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान हिस्स्याच्या जागेतील टाईल्स बदलण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच रागातून सुधाकर गोपाळ राणे यांनी कोयत्याने डोक्यावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नंदकुमार राणे यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर स्वरूपाचा हल्ला असूनही वैद्यकीय अहवालात साधारण दुखापत नमूद करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांवर दबाव होता का? गंभीर जखमा लपवण्याचा प्रयत्न झाला का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असली तरी आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भरदिवसा कोयत्याने हल्ला होतो, व्यक्ती गंभीर जखमी होते, तरीही तात्काळ कारवाई का झाली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

राजकीय दबावामुळे पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणा निष्क्रिय झाली आहे का? जखमी वयोवृद्धाला न्याय मिळणार का? आणि या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ अधिकारी नेमकी काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version