आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
अलिबाग सत्र न्यायालयाचा निर्णय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
किरकोळ वादातून सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला. वासूदेव एकनाथ नाईक असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर घटना पेण तालुक्यातील निगडे आदिवासी वाडी येथे ७ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली होती. एकनाथ चिमा नाईक यांच्या घरात मयत सुनील नाईक आणि वासुदेव नाईक हे सख्खे भाऊन एकत्र राहत होते. दोन्ही भावांमध्ये सातत्याने वादविवाद आणि भांडणे होत होती. याच भांडणाच्या रागातून वासूदेव नाईक यांनी घरातील कोयत्याने सुनिल नाईक यांच्या डोक्यात आणि मानेवर वार करून ठार मारले होते. या प्रकरणी वडिल एकनाथ चिमा नाईक यांच्या तक्रारीनुसार वडखळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी आर कुंभार यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणीची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायाधिश अशोककुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून जिल्हा सरकारी वकील भुषण साळवी यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आला. यात फिर्यादी एकनाथ नाईक, आकाश नाईक, तुकाराम नाईक आणि पोलीस निरीक्षक बी आर कुंभार यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला, आणि आरोपी वासुदेव नाईक याला सख्या भावाचा खून केल्या प्रकरणी दोषी ठरविले. आरोपीला भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि दंडही १० हजार रुपयांचा ठोठावला.