| तळा | प्रतिनिधी |
मागील भांडणाचा राग काढून तळा येथील सार्वजनिक रस्त्यावर चार जणांनी मिळून 36 वर्षीय तरूणाला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2008 साली गट नं. 184 अ मधील जुन्या थाल (बांध) च्या पुर्वेकडील सर्व जमीन गजानन शिंदे यांच्याकडून सोमनाथ गोळे, दादा चव्हाण, रमेश जाधव, सुखदेव चव्हाण, रविंद्र चव्हाण, सतिष गोळे व एकनाथ चव्हाण यांनी साध्या साठे करारावर 3 लाख रुपयांवर घेतली होती. या जमीनीवर राहूल गोळे हे झोपडी बांधून कुटुंबींयासह राहत आहेत. ही जमीन नावावर होण्यासाठी राहूल यांनी प्रयत्न केले असता गजानन शिंदे यांनी वारंवार टाळाटाळ केली. त्यामुळे आजपर्यंत जमीन राहूल गोळे यांच्या नावावर होऊ शकली नाही. उलट लक्ष्मण उर्फ गजानन शिंदे, यांच्यासह दिलीप शिंदे, नितीन बाईत व अविनाश शिंदे या चौघांनी मिळून राहुल गोळे (36) यांना बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.







