पोटात खुपसली कैची, डोक्यात घातले मशीन
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका 40 वर्षीय महिलेच्या पतीने आधी तिच्या पोटात कैची खुपसिली आणि नंतर शिलाई मशीन डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी त्या महिलेच्या पतीस ताब्यात घेतले आहे. ही घटना कर्जत-कल्याण रस्त्यावरील हालीवली भागात घडली. कर्जत येथील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत येत सिंगनेचर डिझायर संकुल या इमारतीत भाडे तत्त्वावर गेली वर्षभर संजय रामजे भालेराव हा आपल्या पत्नी, मुलांसोबत राहात आहे. संजय आणि पत्नी पूजा यांच्यामध्ये आदल्या दिवशी घरगुती वाद झाला होता.
यावरून पत्नीने कर्जत पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रारदेखील दिली. यानंतर पूजा ही आपल्या भावाकडे वांगणी येथे राहण्यासाठी गेली होती. त्यामुळे संजय त्याची मोठी मुलगी घरात होती. शुक्रवारी पहाटेच मुलीने आपल्या आईला फोन करून आठवण येते म्हणून आपल्याला घ्यायला ये असे सांगितले होते. तशी पूजा आपल्या मुलीला भेटायला सकाळीच कर्जत हालीवली येथील घरी आली होती. दरम्यान, यावेळी पती संजय याने मुलीला हॉलमध्ये बाहेर ठेवून पत्नीला बेडरूममध्ये कोंडून कपडे कापणार्या कैचीने पत्नीच्या व पाठीवर चार ते पाच ठिकाणी खुपसले होते. यानंतर शिलाई मशीनदेखील डोक्यात घालून पत्नीचा खून केला. यावेळी रक्तच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला पाहून पळ काढीत असताना असणार्या पतीसमोरच अचानक सासू उपस्थित झाल्याने संजयने सासूलादेखील धमकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला.
कर्जत पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय सहायक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे व कर्जत पोलीस टीम हजर झाली. घटनास्थळाहून पळून जाणार्या संजयला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले आहे. व्यसनाच्या आधीन असलेल्या संजयने आपल्या पत्नीचा खून हा चारित्र्यावर असलेल्या संशयावरून, तर आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात केलेली तक्रार यावरून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संजय हा लोकल वडापाव विकण्याचा व्यवसाय करीत असून, त्याला तीन मुली व एक मुलगा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.