बीएसएनल टॉवर नावापुरताच

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील सांगवड येथील बीएसएनएलचा टॉवर गेली 20 ते 25 वर्षे दुर्लक्षित, गावकऱ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. मौजे सांगवड हा अत्यंत डोंगराळ, ग्रामीण परिसर आहे. गाव अतिशय उंचावर असल्याने 25 वर्षांपूर्वी परिसरातील अनेक ग्रामस्थांनी बीएसएनएल टॉवरची मागणी केली होती. त्याप्रमाणे सांगवड येथे टॉवर उभारण्यात आला. मात्र तो टॉवर सुरु व्हावा ही मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत असतानाही संबंधित खात्याकडून दखल घेतली गेली नाही. आजही आवश्यकता असतानाही अनेक ग्राहक जोडणी घ्यायला तयार असतानानाही ग्रामस्थांना कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून याला वाचा फोडावी म्हणून ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून रविप्रभा मित्र मंडळातर्फे संस्थापक रविंद्र लाड यांनी म्हसळा येथील मुख्य कार्यालयात संबंधित अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. जर हा टॉवर सुरु झाला तर परिसरातील ठाकरोली, कोकबलन्यू अनंत वाडी, तोराडी आणी आजबाजूचा परिसर यांना निश्चितपणे फायदा होईल. रविंद्र लाड यांनी आणि संस्थेचे सल्लागार संतोष उद्धरकर यांनी म्हसळाचे जनरल टेलिफोन आँफिसर अखतर खान यांना कार्यालयात जावून निवेदन देण्यात आले.

सांगवड टॉवर काही तांत्रिक कारणास्तव बंद झाले होते. त्यामुळे ग्राहकांना सेवा देता आली नाही व थोडेसे नुकसान सहन करावे लागले. पण आम्ही लवकरात लवकर तो टॉवर सुरू करून देतो.

अखतर खान, जनरल टेलिफोन अधिकारी, म्हसळा.
Exit mobile version