। उरण । वार्ताहर ।
अति उच्चदाब वीज वाहिनीतून मोठ्या दाबाने वीज वितरीत केली जात असल्याने या वीज वाहिनीच्या ठराविक अंतरावरून जरी एखादी वस्तू गेली तरी वीजवाहिनी ही वस्तू खेचून घेते. त्यामुळे या वाहिन्यांखाली कोणतेही बांधकाम करण्याला बंदी आहे. मात्र, असे असतानाही कंठवली गावाजवळ या वीज वाहिन्यांच्या खाली अनधिकृत बांधकाम सुरू असून, येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी सिडकोने येथे एका व्यावसायीकाचे एक अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते. त्याच ठिकाणी सिडकोच्या व महसूल, महावितरण अधिकार्यांच्या नाकावर टिच्चून हे अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे त्याच्या वरून अति उच्च दाब वीज वाहिनी (टॉवर लाईन) गेली आहे. त्याच्या बरोबर खाली हे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करताना या ठिकाणची खारफुटीदेखील तोडण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी वीज वाहिनीच्या तारा खाली आल्या आहेत. तसेच प्रवासी वाहतुकीचा महत्त्वाचा रस्ताही जात आहे. त्यामुळे येथे मोठा धोका संभवत आहे.
बोकडविरा येथिल वायु विद्यूत केंद्रातून तयार झालेली विजेचा पुरवठा इतरत्र औद्योगिक विभागाला करावा यासाठी ही टॉवर लाईन उभारण्यात आली आहे. या टॉवर लाईनखाली कोणतेही बांधकाम करण्याला बंदी आहे. आत्ता मात्र या जागांवरदेखील या व्यावसायिकांची नजर गेली असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने पुढे येण्याची गरज येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.