अॅड. निलीमा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
। पेण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नाने पेण तालुक्यातील पाबळ या दुर्गम व दर्या खोर्यांच्या विभागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून, अॅड. निलीमा पाटील यांनी यासाठी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 4 फेब्रुवारी 2022 च्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पाबळ, ता. पेण येथील मुख्य इमारत बांधकाम करणे या कामास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून 225.47 लक्ष निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी 47.35 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
पेण तालुका म्हटल्यानंतर रायगडचे मध्यवर्ती ठिकाण. या तालुक्याचे आरोग्य एक जिल्हा उपकेंद्र आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याभोवतीच फिरते. माजी राज्यमंत्री स्व. मोहन पाटील यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू उभी करण्यात व सुरु करण्यास मोलाची कामगिरी बजावली. दरम्यान, पाबळ विभाग हा दुर्गम व दर्या खोर्याचे असून, प्राथमिक आरोग्य केंद्र गडबपासून भौगोलिकदृष्ट्या खूपच दूरवर असल्याने अनेक वेळा या विभागामध्ये कळत-नकळत आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्ष होत होते. त्यामुळे या विभागामध्ये विभागासाठी स्वतःचे प्राथमिक आरोग्य केंद्र असावे, यासाठी अॅड. निलिमा पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला.
जागा निश्चित करुन ती जागा उपलब्ध शासनाला करुन देण्यापासून ते एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या सर्व नाहरकत दाखले जमा करेपर्यंत ते थेट निधी उपलब्ध कसा होईल, तिथपर्यंत स्वतः लक्ष देऊन कामे केली. अखेर गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन 4 फेब्रुवारी 2022 च्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पाबळ, ता. पेण येथील मुख्य इमारत बांधकाम करणे या कामास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून 225.47 लाख निधीची तरतूद करुन त्यापैकी 47.35 लक्ष निधी उपलब्ध झालेली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पाबळ ज्यावेळेला पूर्ण होईल, त्यावेळेला खर्या अर्थाने पाबळ खोर्यातील जनतेचा आरोग्याचा प्रश्न निकाली निघून आरोग्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. ही पायपीट थांबविण्यासाठीच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती अॅड. निलिमा पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत पाबळ विभागातील नागरिक त्यांचे आभार मानत आहेत.