बुध्द व आंबेडकरांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाजने येथील बौध्द ग्रामस्थ व महिला मंडळाच्यावतीने गुरुवारी(दि.23) बुध्द जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बौध्दाचार्य ओव्हाळ गुरूजींच्या मार्फत हा कार्यक्रम पार पडला.
महाजने गावांतून सकाळी भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची मिरवणूक रथातून काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये बौध्द ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी, सगेसोयरे आदी असंख्य अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी, गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करीत ही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधीवत पुजा करीत बौध्दाचार्य ओव्हाळ गुरूजी, महेश जाधव यांच्या मार्फत ग्रामस्थ व महिलांच्या हस्ते मुर्तींची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी ओव्हाळ गुरूजींनी वैशाख पौर्णिमा, बुध्द पौर्णिमेचे महत्व पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आनंदमय व मंगलमय वातावरणा हा सोहळा पार पडला.