माणगावात बौद्ध धम्म परिषद आयोजित करणार – पंकज तांबे

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावात लवकरच आपण बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे यांनी निजामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सखाराम गायकवाड हे उपस्थित होते.
आम्रपाली मित्रमंडळ निजामपूर यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती व सत्कार समारंभ कार्यक्रम आम्रपाली बुद्धविहार निजामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांसह सर्व उपस्थित बौद्ध बांधवानी अभिवादन केले. या समारंभाला मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे, बहुजन हितकारिणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव, विभागीय अध्यक्ष स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड, शाखा क्र 2 चे अध्यक्ष अशोक गायकवाड, नागचंद सावंत, प्रताप होवाळ, निजामपूर ग्रामपंचायत सदस्य रोहिदास सावंत, सचिन गंगावणे,कमलाकर गंगावणे आदी मान्यवरांसह बौद्ध समाज बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र: सलीम शेख

Exit mobile version