| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील श्री गोरक्षनाथ मंदिर नवनाथ सत्संग मंडळाच्यावतीने श्री देवी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.11 ते दि.20 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडणार आहेत. या उत्सवाच्या माध्यमातून नामसाधना, ध्यानधारणा, गीतापारायण, देवीपूजन, यज्ञविधी, भजन आणि श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचनांचा आध्यात्मिक लाभ भाविकांना घेता येणार आहे. अशी माहिती मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष सुभाष मस्के यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून दिली.
या उत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळी वैयक्तिक नामसाधना, ध्यान धारणा, गीतापारायण तसेच देवदेवतांची विधिवत पूजा आणि श्री देवी यज्ञविधी होणार आहेत. उपाध्याय सुभाष म्हस्के व उपाध्याय दत्तात्रेय करकरे यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडतील. यानंतर अल्पोपहार, श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचने आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळच्या सत्रात शंका-समाधान, गीता प्रश्नमंजुषा, गुरुसेवा, यज्ञविधी आणि आरती असे कार्यक्रम होतील. त्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचन, हरिजागर आणि नवनाथ सांप्रदायातील मंडळींच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. तसेच, या उत्सवातील महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम म्हणजे नवनाथ सांप्रदायाचा नवीन नामधारक दीक्षाविधी हा आहे. सोमवार, दि.19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत हा विधी होणार आहे. नवनाथ सांप्रदायाची दीक्षा घेण्यास इच्छुक असलेल्या भाविकांनी मंदिराच्या कार्यालयात आगाऊ नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







