। मुंबई । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करीत असताना शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. आर्थिक पाहणीत सकारात्मक चित्र दाखविल्यानंतर अपेक्षित पडसाद भांडवली बाजारात उमटले. मंगळवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स तब्बल १,००० अंकांनी तर निफ्टी २०० अंकांनी वाढला आहे. या तेजीने गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटींची कमाई केली आहे.
अर्थसंकल्पात स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात रियल्टी शेअरला मोठी मागणी दिसून आली. निफ्टी मंचावर निफ्टी ऑटो वगळता सर्वच क्षेत्रात तेजी आहे. सध्या सेन्सेक्स ६८५ अंकांनी वधारला असून, तो ५८६९९ अंकावर आहे. निफ्टी १८४ अंकांनी वधारला असून तो १७५२४ अंकावर ट्रेड करीत आहे.





