। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
उत्पन्न – प्राप्तिकर
0 ते तीन लाख – 0 टक्के
3 ते 6 लाख – 5 टक्के
6 ते 9 लाख – 10 टक्के
9 ते 12 लाख – 15 टक्के
12 ते 15 लाख – 20 टक्के
15 लाख हून अधिक – 30 टक्के
प्राप्तिकराच्या नियम 87A अंतर्गत, सरकार 12,500 रुपयांची कर सवलत देते. करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. ज्यांचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षाही अधिक आहे, त्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. अशा लोकांना केवळ महागाई, आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर वाढलेला ईएमआय आदीमुळे खिशावर अधिकच ताण येतो.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत, ज्येष्ठ नागरिक सध्या कमाल 15 लाख रुपये जमा करू शकतात. ही मर्यादा 30 लाख रुपये करण्यात येणार आहे.
महिलांसाठी बचत योजना
महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा, दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. दोन लाखापर्यंतची रक्कम ठेवता येईल. 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे.