आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यावर भर
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल पालिकेचा 2022-23 चे सुधारित आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शिलकीचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त प्रशासक गणेश देशमुख यांनी मंगळवारी (दि.21) सादर केला. आरंभीच्या शिल्लकीसहित 2 हजार 291 कोटी जमा आणि 2 हजार 291 कोटी 6 लाख खर्च असलेला या अर्थसंकल्पात 42 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत. पालिका सदस्याचा वर्षांचा कार्यकाळ संपला असल्याने प्रशासक म्हणून आयुक्त गणेश देशमुख सध्या पालिकेची जबाबदारी संभाळत आहेत. मंगळवारी पालिका मुख्यालयात मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी प्रशासन प्रयत्न असल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली.
आयुक्त देशमुख यांनी सादर केलेल्या अंदाज पत्रकात 234.72 कोटी रुपये आरंभी शिल्लक, मालमत्ता करातून 1 हजार 191.53 कोटी रुपये, यूडीसीपीआर आणि विकास शुल्क अंतर्गत वसुलीतून 75 कोटी रुपये, प्रीमियम आणि परवाना शुल्कातून 35.22 कोटी, जीएसटीच्या माध्यमातून 159.76 कोटी, 1 टक्के मुद्रांक शुल्क अनुदान कोटी रुपये, 15 व्या वित्त आयोगातून 25 कोटी रुपये, अमृत पाणीपुरवठा योजना अनुदान 123.99 कोटी रुपये, पंतप्रधान आवास योजना (झोपडपट्टी सुधारणा) 200 कोटी रुपये, इतर करेतर महसूल शास्ती व शुल्क अकराणीतून 216.26 कोटी असे एकूण 2 हजार 291.48 कोटी रुपये रक्कम जमा होणे अपेक्षित धरण्यात आले आहेत. तर, पालिका मूलभूत पायाभूत सोयीसुविधा वाढण्यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी 164.17कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. घनकचरा संकलन, वाहतूक व मनुष्यबळाकरिता 117.83 कोटी रुपये, पंतप्रधान आवास योजना (झोपडपट्टी सुधारणा) 200 कोटी, शासन पुरस्कृत अमृत व स्वच्छ भारत योजनेंतर्गत कामाकरिता 131.21 कोटी रुपये, गावठाण क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर 106.69 कोटी, अग्निशमन व व्यवस्थापनेसाठी 49.7 कोटी, बागा आणि उद्यान विकासाकरिता 60.20 कोटी, पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी 116.75 कोटी, विद्युत व्यवस्थेवर 96.65 कोटी, प्राथमिक शिक्षणासाठी 24.12 कोटी, शासकीय परतावे-राज्य शिक्षण आणि रोजगार हमी करापोटी 286 कोटी, इतर विभागांतर्गत महसुली आणि भांडवली कामाकरिता 442.60 कोटी, स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत 110.61 कोटी, आस्थापना आणि इतर प्रशासकीय खर्च पदभरतीसह 121.14 कोटी खर्च केला जाणार असून, 42 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत.
पालिकेची आरोग्य यंत्रणा भक्कम होणार
पालिका हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी पालिका हद्दीत 450 खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार या नावाने भूखंड क्रमांक 8 अ, 8 ब, सेक्टर 18, पनवेल (प.) येथील 8000 चौरस मीटरच्या जागेवर ही इमारत प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयीन इमारत तळघर, तळमजला ते 07 मजल्याची असून, या इमारतीच्या बांधकामाकरिता अंदाजित रु. 225 कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर हिरकणी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, सोनोग्राफी, एक्स-रे विभाग, रक्तपेढी, शवागृह व समुपदेशन विभाग अशा सुसज्ज सुविधा उपलब्ध असणार आहेत.
संसर्ग आजारासाठी इन्फेकशीयस लॅब
कोरोना काळात सुरु करण्यात आलेली पालिकेची स्वत:ची MOL Expert, कोळीवाडा, पनवेल या नावाने ओळखलेली RTPCR Lab चे संसर्ग आजारासाठी इन्फेकशीयस लॅब मध्ये रुपांतर करण्यात आहे. याकरिता अंदाजित रुपये 2 कोटी खर्च अपेक्षित आहे. या लॅबमधुन जनतेसाठी मोफत रोगनिदान चाचण्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
पनवेल महानगरपालिकेकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नव्याने 09 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास (UPHC) मान्यता प्राप्त झालेली असून, प्रती नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी अंदाजित रु. कोटी खर्च अपेक्षित असून, त्याकरिता रु. 20 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.
शहरी समुदाय आरोग्य केंद्र
पनवेल महानगरपालिकेच्या नागरीकांना आंतररुग्ण सेवा तसेच महिलांकरिता प्रसूती सेवा सुविधा उपलब्ध करुन देणेकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 50 खाटांचे 02 शहरी समुदाय आरोग्य केंद्राकरिता (UPHC) मान्यता प्राप्त झाली आहे.
कोव्हिड रुग्णांच्या उपचाराकरिता प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेले प्लॉट नं. 1 सेक्टर 5 ई, कंळबोली, येथिल ऊउक रुग्णालय हे सद्यस्थितीत वापरात नसुन त्याच्या वापरात बदल करुन शहरी समुदाय आरोग्य केंद्र (UPHC) प्रस्तावित करण्यात आले आहे. याकरिता रु. 06 कोटी खर्च अपेक्षित आहे.
पनवेल क्षेत्रातील महिलांना प्रसुतीच्या सेवा व रुग्णांस आंतररुग्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता प्राधिकरणामार्फत तळोजा येथे जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. सदर शहरी समुदाय आरोग्य केंद्राच्या (UPHC) बांधकामासाठी रु. 10 कोटी खर्च अपेक्षित आहे.
मोबाईल मेडिकल युनिट
शहरातील झोपडपट्टी भागात व आरोग्य केंद्रापासुन दुर असलेल्या भागामध्ये फिरत्या वाहनाद्वारे नागरीकांना प्राथमिक, उपचारात्मक आणि संदर्भ आरोग्य सेवा नियमितपणे व मोफत पुरविणेकामी पनवेल महानगरपालिका स्तरावरुन मोबाईल मेडिकल युनिट प्रस्तावित असुन त्याकरिता रु. 1 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.