| मुंबई | दिलीप जाधव |
राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी (3 मार्च) पासून मुंबईत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन हे अधिवेशन वादळी ठरण्याचीद दाट शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही बाजुकडून आरोप,प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी भाजपने बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी बुधवारी सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीचे मंत्री,आमदारांची बैठक बोलावली. याला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली.
भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांचे गँगस्टर दाऊदसोबत संबंध आहेत. मुंबईत दहशतवाद पसरवणार्या व्यक्तींना पाठिशी घालणार्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, आरपीआयचे नेते अविनाश महातेकर आदी उपस्थित होते.
आम्हाला चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे. अनेक वर्षांनंतर 17-18 दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही समोर जाऊ. विरोधकांची मुस्काटदाबी करून लोकशाही पायदळी तुडवली, त्यानुसार आम्हालाही या सगळ्याचा विचार करावा लागेल, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकर्यांचे विजेचे कनेक्शन कापण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.