| मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भविष्यातील काही चांगल्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. न्यू एज या आपल्या संकल्पनेलाही अर्थसंकल्पात आपल्या संज्ञेसह घेतले आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्रामधील महत्त्वाच्या बदलांवर अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूदही महत्त्वाची ठरणारी आहे, असा विश्वास अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित केलेल्या ङ्गअर्थसंकल्प विश्लेषणफ या व्याख्यानात बोलताना व्यक्त केला.
देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसर्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने अर्थसंकल्प विश्लेषणाचे हे व्याख्यान दरवर्षी आयोजित केले जाते. डॉ. जाधव गेल्या आठ वर्षांपासून या विश्लेषणाचे सादरीकरण करीत आहेत. स्मारकातील मादाम कामा सभागृहात झालेल्या या विश्लेषणाच्या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अर्थसंकल्पाबरोबरच विविध आर्थिक आणि देशाच्या संबंधातील विषयांनाही डॉ. जाधव यांनी लोकांपर्यंत सादर केले. आयकराच्या रचनेतले बदल खूप अपेक्षित होते. आयकर मर्यादा वाढवावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्वी होती, त्याबद्दल आपण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सांगतही आहोत. आता ती दिली आहे. 7 लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचे असेल त्यांना काहीही कर द्यावा लागणार नाही ही तरतूद दिलासाजनक आहे. मात्र, यामध्ये खरा फायदा होणार आहे तो वरच्या श्रेणीतील करदात्यांना. कर दरांमध्ये सर्वांत मोठी कपात आहे ती सर्वांत मोठ्या टॅक्स ब्रॅकेटसाठी. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 30 लाखापेक्षा जास्त आहे ज्यामध्ये कोट्यधीश-अब्जाधीश आले. वास्तविक पाहता त्यांना करकपातीचा फायदा जास्त मिळणार आहे. मात्र याचा अर्थ खूप वाढलेली आर्थिक विषमता कमी व्हायला मदत होईल, हे संभवत नाही, असेही मत डॉ. जाधव यांनी नोंदवले.
सुरुवातीला सावरकर कला प्रबोधिनीच्या अथर्व कंठी, मृण्मयी सहानी, प्रांजल सरोज, प्रणिता आमकार, शुद्धी तळवलकर यांनी सावरकरलिखित शस्त्रगीत सादर केले. सूत्रसंचालन विनीत देव यांनी केले. उपस्थितांच्या प्रश्नोत्तरानंतर सावरकरांची नात चित्रा मसलेकर यांनी गायलेल्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.