कारच्या धडकेत म्हशींचा मृत्यू

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ धनगरवाडी येथे भरधाव वेगात जाणार्‍या कारने तीन म्हशींना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.13) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला असून शेतकरी लवू गोरे यांचे सुमारे 4 लाख 10 हजारांचे नुकसान झाले आहे.

लवू गोरे यांची ही जनावरे शुक्रवारी सायंकाळी शेतातून घराकडे जात असताना रस्त्यावरून जाणार्‍या भरधाव कारने (एमएच-03-सीएस-2644) जोरदार धडक दिली. या धडकेत तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. तर, एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. तसेच कारचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात दुभत्या म्हशींचा मृत्यू झाल्याने शेतकर्‍यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी कारचालक अमोल अनिल आचरेकर (34) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राजापूर पोलीस करीत असून पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांसह पशुवैद्यकीय अधिकारी किनरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.

Exit mobile version