कारखानदारांची राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका
| पनवेल । वार्ताहर ।
तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणाचा विषय नेहमीच गाजत आला आहे. प्रदूषणावरून राष्ट्रीय हरित लवादामध्ये यापूर्वीच याचिका दाखल झाली आहे. मात्र प्रदूषणावरून कोंडीत सापडलेल्या कारखानदारांनी देखील आपल्या हक्कासाठी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. कारखानदारांच्या तळोजा मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन (टीएमए) ने एमआयडीसी परिसरात नियमाप्रमाणे बफर झोन असावा याकरिता राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे.
तळोजा एमआयडीसी परिसरात सिडको, पालिकेच्या परवानवीगीने असंख्य गृहप्रकल्प सुरु आहेत. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे देखील प्रकल्प याठिकाणी सुरु आहेत. वाढती लोकवस्तीमुळे नागरिकांची प्रदूषणावरून ओरड वाढली आहे. त्यानुसार प्रदूषणाच्या तक्रारी वाढल्या असल्याने कारखानदार यामुळे चिंतेत आहेत. एमआयडीसी परिसरात किमान 500 मीटर पर्यंत कोणतेही प्रकल्प अथवा लोकवस्ती येणार नाही याबाबत भारत सरकारचाच 2001 चा आदेश आहे. या आदेशाचा दाखला देत 500 मीटर पर्यंत बफर झोन उभारून या परिसरात लोकवस्ती अथवा कोणते प्रकल्प येणार नाहीत, जेणे करून संबंधितांना त्याचा त्रास होणार नाही अशी याचिका राष्ट्रीय हरित लवादामध्ये टीएमएच्या वतीने अध्यक्ष शेखर शृंगारे यांनी दाखल केली आहे. पुढील दि.28 रोजी या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे प्रथमच कारखानदार आपल्या हक्कासाठी न्यायालयीन लढा देत असल्याचे दिसून येत आहे.
एमआयडीसी सभोवताली बफर झोन असणे गरजेचे असताना सिडको आणि पालिका प्रशासनाने एमआयडीसी लगत मोठ मोठे गृहप्रकल्प उभारण्यासाठी परवाणगी दिलीच कशी? हा देखील प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणासंदर्भात माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेमुळे आजवर मोठ्या संख्येने दंड कारखानदारांकडून वसुल करण्यात आला आहे. मात्र कारखानदारांनी याचिका दाखल केल्याने बफर झोन बाबत नव्याने चर्चा रंगु लागल्या आहेत. तळोजा एमआयडीसी मध्ये जवळपास 950 कारखाने आहेत. यामध्ये 350 रासायनिक कारखाने आहेत. असे राज्यातील सर्वात मोठ्या एमआयडीसी मधील हि एक एमआयडीसी आहे. त्यामुळे शासनाला देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न याठिकाणाहून कराच्या रूपाने मिळत आहे. असे असताना काही घटक एमआयडीसीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कारखानदार करीत आहेत.
सुरु असलेल्या बांधकांचे काय ?
एमआयडीसी परिवारात पाचशे मीटरपर्यंत बफर झोन असावे हि कारखानदारांची मागणी रास्त आहे. भविष्यात दुर्दवी घटना घडल्यास रहिवाशांना त्रास नको म्हणुन बफर झोनची संकल्पना आखली गेली आहे. मात्र तळोजा एमआयडीसी ला लागूनच शेकडो गृहप्रकल्प सुरु आहेत. असंख्य जणांनी याठिकाणी घरे बुक केली असताना बफर झोन बाबत न्यालयात वाद सुरु असताना या परिसरात सुरु असलेल्या बांधकांचे काय ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एमआयडीसी परिसरात बफर झोन असावे हा शासनाचाच निर्णय आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही याचिका दाखल केली आहे. भविष्यात आमच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक निर्णय होईल आणि हे येथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील तितकेत गरजेचे आहे.
शेखर शृंगारे
याचिकाकर्ते