| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येत्या 15 मार्चपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची तारीख लांबण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील सोमवार, म्हणजे 18 मार्च किंवा त्यानंतर लोकसभेचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांचा राजीनामा यामुळे निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त झाली आहेत. या नियुक्त्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक 13 किंवा 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवार, 15 मार्च रोजी दोघा आयुक्तांची नियुक्ती होण्याचे संकेत मिळत आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागेल आणि ही नियुक्ती करता येणार नाही. त्यामुळे येत्या आठवड्यात तातडीने ही पदं भरली जातील.
दरम्यान, पुढे 16-17 तारखेला शनिवार-रविवार असल्यामुळे आतापर्यंतचा इतिहास पाहता, त्या दिवशी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील सोमवारी म्हणजे 18 मार्च किंवा त्यानंतर लोकसभेचं बिगूल वाजण्याची चिन्हं आहेत.
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा नवा कायदा नुकताच अंमलात आला आहे. तत्पूर्वी, या प्रक्रियेत सरन्यायाधीशांचाही समावेश होता. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार हे एकटेच आयुक्त राहिले आहेत. निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे (65) 14 फेब्रुवारीला निवृत्त झाले.