जुन्या साकवच्या जागी नवे रुंद पूल बांधा-वैजनाथ ठाकूर

| उरण | वार्ताहार |

तालुक्यातील धुतुम-बैलोंडा खाडीवर (नांदोरा) बांधलेला साकव जिण्र झाला आहे, तसेच दिघोडे उघडीवरील साकव देखील नादुरुस्त झाल्याने या दोन्ही ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी केली आहे. मात्र कायद्यानुसार येथेविकास कामे करता येणार नसल्याचे सांगत सिडको प्रशासनाने हातवर केले आहेत.

मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती उरण, सिडको प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी त्यांनी याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. सदरचे साकव जूने झाले आहेत. शिवाय, रहदारीच्या दृष्टीने हे साकव निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. तसेच सदर साकव अरुंद असल्याने एकाच वेळी दोन्ही बाजूच्या वाहनांना एकाच वेळी प्रवास करताना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडीची देखील समस्या निर्माण होते.

दिघोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने धुतुम गावातील लोकांना दोघोडे येथे जाण्यासाठी सुलभ मार्ग निर्माण होईल किंवा दिघोडे येथील नागरिकांना धुतुम येथे सुलभपणे जाता येईल. शिवाय धुतुम गावात आयओटीएल ही ज्वलनशील पदार्थची कंपनी कार्यरत आहे. येथे भविष्यात एखादी आग लागली तर अग्नीशमनच्या वाहनांना किंवा रुग्णवाहिकेसह अन्य वाहनांना येण्या-जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण झाल्यास सुसज्ज असे नवीन पूल, नवीन रस्ते असणे गरजेचे आहे. त्यामूळे जनतेचे हित लक्षात घेऊन प्रवास सुखकर करावा,अशी मागणी निवेदनात केली आहे.

सदरील साकवची जागा ही कांदळवन क्षेत्र व किनारपट्टी राखीव, 50 मीटर बफर क्षेत्रामध्ये येते. भारत सरकारच्या 18 जानेवारी 2019 च्या अधिसुचेनुसार सदर क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे नविन बांधकाम व विकास कार्य करण्याची परवानगी नसल्यामुळे सदर नवीन पुल बांधण्याचे काम करता येऊ शकत नाही, असे सिडकोने वैजनाथ ठाकूर यांना कळविले आहे. मात्र ठाकूर यांनी याप्रकरणी पाठपुरावा सुरुच ठेवला आहे.

Exit mobile version