नवे रुंद पूल बांधण्याची वैजनाथ ठाकूर यांची मागणी
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील धुतुम गावाजवळ असलेले धुतुम बैलोंडा खाडीवर (नांदोरा) बांधलेला जुना साकव (पायवाट) तसेच दिघोडे उघडीवरील साकव नादुरुस्त होऊन मोडकळीस आलेले असून सिडकोच्या माध्यमातून जुन्या साकवच्या जागी नवीन पूल बांधण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य कुंदा ठाकूर, वैजनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती उरण, सिडको प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली होती.
धुतुम येथील सदर पूल जूने झाले आहेत. शिवाय रहदारीच्यादृष्टीने हे साकव निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. येथे अजूनही पायवाट असल्यामुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.दिघोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने धुतुम गावातील लोकांना दोघोडे येथे जाण्यासाठी सुलभ रस्ता तयार होईल. किंवा दिघोडे येथील नागरिकांना धुतुम येथे सुलभपणे जाता येईल. शिवाय धुतुम गावात आयओटीएल ही ज्वलनशील पदार्थची कंपनी कार्यरत आहे. येथे भविष्यात एखादी आग लागली तर फायर ब्रिगेडच्या वाहनांना किंवा ऍम्ब्युलन्स आदी वाहनांना येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण झाल्यास सुसज्ज असे नवीन पूल, नवीन रस्ते असणे गरजेचे आहेत. हा पूल तयार झाल्यास दिघोडे येथील मच्छिमार करणार्या कोळी बांधवांना तसेच जहाज बांधणीचे काम करणार्या कामगारांना याचा खूप मोठया प्रमाणात फायदा होणार आहे. काही महिन्या पूर्वी पुलावर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशी दुर्घटना परत होऊ नये, भविष्यात कोणतेही दुर्घटना होऊ नये तसेच जनतेचे हित लक्षात घेउन नागरिकांचा प्रवास सोप्पा व्हावा, सकाळी नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी जूना साकव (पूल) पाडून त्या जागी नविन पूल बांधावे व हे काम जिल्हा परिषदकडे वर्ग करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.