। तळा । वार्ताहर ।
गिरणे ते हाल खाडीपूलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गोविंद कीर्तने यांनी केला आहे. गिरणे ते हाल खाडी पूल हा नागरिकांच्या दळणवळणासाठी सोयीस्कर असून गिरणे, मेढा, विरजोली व पढवण या चार ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास पंचवीस गावातील ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक व महत्वाचा मार्ग आहे.या खाडीपुलासाठी माजी राज्यमंत्री रवींद्र पाटील यांनी दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. परंतु स्थानिक नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे तो निधी परत पाठवला गेला. या खाडीपुलासाठी 2004 साली पंचक्रोशीतील नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन अनेकदा शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाकडून कायम याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात या खाडीतून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सदर पुलाच्या कामाची सूत्रे हलली नाहीत तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशाराही यावेळी गोविंद कीर्तने यांच्याकडून देण्यात आला आहे.