सिडकोच्या सवलतीच्या भूखंडावर इमारत

| पनवेल । वार्ताहर ।
सिडकोने वैद्यकीय शैक्षणिक संस्था, तसेच रुग्णालय उभारण्यासाठी राखीव भूखंड ठेवले आहेत. हे भूखंड सवलतीच्या दरात खरेदी करून त्यावर इमारतीचे बांधकाम करत भूखंडाचा गैरवापर केल्याचे समोर आले. याप्रकरणी डॉक्टर व विकसकाविरोधात खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडकोकडून नवीन पनवेल येथे वैद्यकीय वापराकरिता भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. त्यांचा वापर केवळ वैद्यकीय वापरासाठीच करावा, अन्य कोणत्याही कामासाठी वापर करू नये अशी अट आहे. डॉ. नंदकुमार गायकवाड या व्यक्तीने नील डेव्हलपर्सचे विलास कोठारी यांच्याशी संगनमत करून सिडकोच्या कराराच्या अटी व शर्तींचा भंग करत 14 नोव्हेंबर 2006 रोजी करार केला. गायकवाड आणि विलास कोठारी यांची नील डेव्हलपर्स यांच्यादरम्यानच्या करारानुसार भूखंडावर बांधण्यात येणार्‍या इमारतीमधील बांधकाम दोघांनी समप्रमाणात वाटून घेतले आणि ही बाब सिडकोपासून लपवून ठेवली. तसेच भूखंड विकसित करण्यासाठी सिडकोची परवानगी घेतली नाही. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तळमजल्यावरचे गाळे व्यापार्‍यांना बेकायदा नोंदणी करत विकले. माहिती अधिकारात ही बाब समोर आल्यानंतर सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याप्रकरणी खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Exit mobile version