पालिकेमार्फत नोटीस बजावूनही पाणी, वीजपुरवठा कायम
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पालिका हद्दीत जवळपास 80 रहिवासी इमारती राहण्यासाठी अतिधोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. असे असतानाही अतिधोकादायक ठरवण्यात आलेल्या या इमारतीमध्ये रहिवासी अद्यापही वास्तव्य करत आहेत. अतिधोकादायक ठरवण्यात आलेल्या अशा इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात यावा यासाठी पालिकेमार्फत महावितरण आणि पाणीपुरवठा विभाग यांना पाठवण्यात आलेल्या पत्रानंतरदेखील तो सुरु ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
नागरिकांना राहण्यासाठी धोकादायक झालेल्या इमारतीचे सर्वेक्षण पालिकेमार्फत दरवर्षी करण्यात येत असते. या सर्वेक्षणातून राहण्यासाठी अतिधोकादायक झालेल्या इमारती खाली करून तेथे वास्तव्य करणार्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे काम पालिकेमार्फत केले जाते. पनवेल पालिकेमार्फतदेखील पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पालिकेच्या चारही प्रभागांत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार पालिका हद्दीत तब्बल 80 रहिवासी संस्थांमधील इमारती रहिवाशांच्या राहण्यायोग्य नसल्याची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र, असे करताना अतिधोकादायक ठरवण्यात आलेल्या या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासन काय उपाययोजना करणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ड प्रभागात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती
पालिकेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ड प्रभागात सर्वाधिक 48 इमारती अतिधोकादायक स्वरूपात असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्या खालोखाल अ प्रभागात 13, ब प्रभागात 10 तर क प्रभागात 9 इमारती राहण्यासाठी अतिधोकादायक आहेत.
अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीची कॅटेगरी
राहण्यासाठी अतिधोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारतींना पालिकेमार्फत सी 1 हा दर्जा दिला जातो, तर राहण्यासाठी धोकादायक पण दुरुस्ती करण्यात आल्यानंतर राहण्यासाठी योग्य इमारतींना सी 2 बी हा दर्जा दिला जातो.
राहण्यासाठी अतिधोकादायक ठरवण्यात आलेल्या रहिवासी इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात यावा यासाठी पालिकेमार्फत संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
मंगेश चितळे,
आयुक्त, पनवेल पालिका







