रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विशेष निमंत्रित
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सहकार क्षेत्राला नवचैतन्य देणारी देशातील अग्रगण्य पतसंस्था बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम देवकिसन चांडक उर्फ भाईजी यांच्या 75व्या जन्मवर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. हे औचित्य साधून संस्थेचे जनरल मॅनेजर कैलास कासट, आयटी मॅनेजर शेट्टी यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांची भेट घेऊन बँकेला निमंत्रित करताना संस्थेच्या चार दशकांच्या यशस्वी वाटचालीचा आणि सहकारातून घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या उत्सवाची माहिती दिली.
1986 साली जनतेच्या पैशातून जनतेचे भले या तत्त्वावर उभारलेली बुलढाणा अर्बन आज भारतातील सर्वात मोठी सहकारी पतसंस्था म्हणून ओळखली जाते. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या दूरदृष्टीतून आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकश जमवार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती साधली आहे आणि विशेष म्हणजे संस्थात्मक उभारणी आणि संस्था हीच आपली ओळख हे आपल्या कामगिरीने देशाला पटवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
बुलढाणा अर्बनची कार्ययात्रा
गेल्या चार दशकांत बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेडने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संगम साधला आहे. आज संस्थेकडे 17 लाख सभासद, 476 शाखा, 7,000 पेक्षा अधिक कर्मचारी असून तब्बल 25,000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय संस्थेने मार्च 2025 अखेर पूर्ण केला आहे. ज्यामध्ये 15,000 कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी तर सोनेतारण कर्ज पोर्टफोलिओ 4000 कोटी रुपयांहून अधिक, वेअरहाऊस लोन 1,600 कोटी रुपये, तसेच इतर कर्ज योजनासह कर्जाचा विस्तार 10,000 कोटी रुपयांपर्यंत विस्तारला आहे. संस्थेचे महाराष्ट्रसह मध्यप्रदेश,कर्नाटक आणि तेलंगणामध्ये देखील जाळे पसरले आहे. औद्योगिक शेती प्रकल्प आणि लघुउद्योजकांना भांडवल सहाय्य देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी संस्थेने तब्बल 431 गोडावून उभारले आहेत.
जलसंधारण क्षेत्रात बुलढाणा अर्बनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येलगाव धरणाचे खोदकाम करून 50 लाख घनमीटर (5 कोटी लिटर) क्षमतेची वाढ करण्यात आली. 25 मोठे एक्स्काव्हेटर्स आणि 1,000 ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने हे कार्य पूर्ण करण्यात आले. तसेच 300 हून अधिक फार्म पाँड्स, गॅबियन बंधारे, फार्म लेव्हलिंग आणि चेकडॅम्स उभारून 1,900 दशलक्ष चौरस मीटर जमिनीखाली पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे.
शिक्षण आणि संस्कार क्षेत्रातही संस्था पुढे आहे. वेद विद्यालय स्थापन करून वैदिक शिक्षणाचा प्रसार सुरू केला आहे. बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत, सहकार विद्या मंदिर या इंग्रजी माध्यमाच्या शाळांद्वारे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. संस्थेने उभारलेल्या 22 शाळांमध्ये एकूण 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, योग, संगणक शिक्षण, संस्कृत श्लोक पठण, नृत्य, संगीत, कराटे, इनडोअर गेम्स, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि सैनिक प्रशिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. सहकार विद्या मंदिर हे विदर्भातील जिल्हास्तरीय पहिले बोर्डिंग स्कूल असून, 4 कोटी रुपयांच्या निधीने स्थापन केले गेले आहे आणि 16 शाखा सुरू करण्यात आले आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळा बॅग, टिफिन, होमवर्क, ट्युशन क्लासेस आणि शिक्षण शुल्क यापासून मुक्त ठेवले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. आज बुलढाणा येथील एकाच शाळेत तब्बल 5000 पेक्षा विद्यार्थी असून 2000 विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. संस्थेच्या वतीने 5 ठिकाणी ज्युनिअर कॉलेजसुद्धा उभारलेले आहेत ज्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ होत आहे.
तसेच संस्थेच्या वतीने श्रद्धास्थानांवर 5 भव्य भक्ती निवास शिर्डी, तिरुपती, ओंकारेश्वर, माहूर आणि नागपूर येथे उभारण्यात आले असून, 700 हून अधिक यात्रेकरूंना एकावेळी निवासाची सुविधा आहे. आतापर्यंत 2 लाख सभासदांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. राज्यातील अनेक पतसंस्था सुद्धा इथे विश्वासाने ठेवी ठेवत आहेत हे सुद्धा एक विशेषच आहे, शिवाय अनेक पतसंस्थाना अडचणीच्यावेळी सहकारातून हात देण्याचे आणि सहकार्य करण्याची भावना बुलढाणा अर्बन संस्थेला इतरांपेक्षा वेगळी ओळख देत आहे.
आधुनिक बँकिंग आणि नवोन्मेष
संस्थेने कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-वॉलेट, इंटरनेट बँकिंग, व्हर्च्युअल कार्ड, आरटीजीएस-एनईएफटी, गोल्ड टेस्टिंग मशीन, व्हिडिओ सर्व्हेलन्स आणि ऑटोमेटेड वेअरहाऊस स्टॅकर्स यांसारख्या अत्याधुनिक सेवा सुरू केल्या आहेत. संस्थेचा अभिनव उपक्रम बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्क हे स्वदेशी ई-कॉमर्स व्यासपीठ आहे, जिथे लाखो सभासद एकमेकांशी व्यावसायिकरीत्या जोडले गेले आहेत. 'सोशल बँकिंग' या अनोख्या संकल्पनेतून संस्थेने आर्थिक उपक्रमांसह आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वृद्ध कल्याण आणि डिजिटल साक्षरता या सामाजिक क्षेत्रांमध्येही मोठे कार्य केले आहे. 9798 टक्के वसुली दरासह बुलढाणा अर्बनने पारदर्शक, जबाबदार आणि जनाभिमुख बँकिंगचा आदर्श निर्माण केला आहे.
रायगड बँकेचे सन्मानपूर्वक आमंत्रण
या अमृतमहोत्सवी सोहळ्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही विशेष निमंत्रित म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रण देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील सुशासन, शून्य निव्वळ एनपीए, सातत्यपूर्ण नफा, आणि तांत्रिक प्रगतीमुळे रायगड बँकेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकारातील सर्वोत्तम पद्धतींच्या आदानप्रदानासाठी आणि सहकार्याच्या भावनेतून बुलढाणा अर्बनने रायगड बँकेला सन्माननीय पाहुणा म्हणून निमंत्रित केले. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचा महाराष्ट्रातील बेस्ट सीईओ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.
प्रेरणादायी प्रवास सहकारातून सहकाराचा विस्तार
बुलढाणा अर्बनचा हा प्रवास केवळ आर्थिक विस्ताराचा नसून सहकार, सामाजिक जबाबदारी आणि नवोन्मेष यांचा संगम आहे. संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या दूरदृष्टीतून रुजलेली ही परंपरा आज संपूर्ण देशातील सहकारी संस्थांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. या प्रवासात बुलढाणा अर्बनने केवळ स्वतःचा विकास केला नाही, तर सहकारी क्षेत्रातील इतर संस्थांसोबत अनुभवांची देवाणघेवाण करून संपूर्ण सहकाराच्या प्रगतीस हातभार लावला आहे. यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारख्या अग्रगण्य संस्थांना विशेष आमंत्रण देऊन त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदर केला आणि सहकारातून सहकार वाढवण्याचे उदाहरण घडवले. संस्थेच्या या दृष्टिकोनामुळे केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर शिक्षण, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्येही सहकारी भावना जोपासली गेली आहे. बुलढाणा अर्बनचा हा प्रवास आज देशभरातील सहकारी संस्थांसाठी आदर्श आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे.






