भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासनाचे मूक पाठबळ?
| रेवदंडा | प्रतिनिधी |
सरकारी जागेवर डल्ला, रायगडमध्ये पैसा बोलतो, शासन झोपले, भ्रष्टाचाराचा कहर अशा अनेक बातम्या रायगडमध्ये ऐकावयास मिळतात. परंतु, आता सरकारी शाळा जमीनदोस्त करण्याचा डाव आखला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील निडी (साळाव) गावची जिल्हा परिषदेची शाळा काही समाजकंटकांनी बेकायदेशीररीत्या जमीनदोस्त करून पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.
शाळेसारखी सार्वजनिक संपत्ती उद्ध्वस्त करून जमीन बळकावण्याच्या या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे की, या शाळेजवळील सरकारी जागा व कांदळवन तोडून एका मोठ्या कंपनीला गुप्तपणे ताब्यात देण्याचा कट रचला जातो आहे. या सर्व कारवायांच्या मागे अर्थपूर्ण व्यवहार, राजकीय पुढाऱ्यांचे आशीर्वाद व बड्या अधिकाऱ्यांचे मूक सहकार्य असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी सरळ प्रश्न केला आहे की हे विदारक चित्र पाहून शासन मूग गिळून गप्प बसण्याचे कारण काय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, शिक्षण सचिव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले यांना ग्रामस्थांनी स्पष्ट मागणी केली आहे की दोषींना त्वरित अटक करून सरकारी जागा सुरक्षित करावी. अन्यथा, ‘जनतेची शाळा वाचवा, सरकारी जागा वाचवा’ या हाकेसह तीव्र आंदोलन उभे करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय उरणार नाही. रायगडमध्ये भ्रष्टाचार इतक्या टोकाला गेला आहे की पैसा असेल तर अनधिकृत कामे अधिकृत केली जातात, सरकारी कागदपत्रांची फेरफार करून जुन्याची नवी व नव्याची जुनी केली जाते. शासनाच्या या बेपर्वाईमुळे लोकांच्या डोळ्यांसमोर सरकारी संपत्ती लुटली जात आहे .





