एसटी बस आगाराचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग आगारातील एसटी बसची धडक लागून बैल जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.21) घडली आहे. चालकाच्या दुर्लक्षपणामुळेच अपघात होऊन बैलाला गंभीर दुखापत झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उपचारासाठी शेतकऱ्याला आर्थिक भूर्दंड बसला आहे. ही घटना घडून आठ दिवस उलटून गेले, तरीदेखील अलिबाग एसटी बस आगारातील प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
अलिबाग तालुक्यातील रामराज येथील शेतकऱ्याचा बैल गुरुवारी सकाळच्या सुमारास रस्त्याजवळ उभा होता. दरम्यान, रामराजहून अलिबागकडे जाणाऱ्या एसटीची जोरदार धडक त्या बैलाला लागली. या धडकेत बैलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी एसटी चालकाला जाब विचारला असता, त्या चालकानेच वरचढ होत शेतकऱ्याला दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून नाराजीचे सुर उमटत आहेत. ही घटना घडून आठ दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील या घटनेबाबत एसटी बस आगारातील व्यवस्थापकांना माहितच नसल्याचे समोर येत आहे. तसेच, या शेतकऱ्यावर उपचाराचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. तो बैल खाण्याच्या परिस्थितीतदेखील नसल्याची माहिती शेतकऱ्याकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अलिबाग एसटी बस आगार प्रशासन काय भुमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.







