ड्रग माफिया महिलेच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांना थेट इशारा देत नवी मुंबई पोलिसांनी आणि सिडको प्रशासनाने बुधवारी धडक कारवाई करत अनधिकृत बांधकामातून सुरू असलेला ड्रग्जचा अड्डा अक्षरशः जमीनदोस्त केला. दिघा येथील ईश्वरनगरमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेचे घर बुलडोझरने उध्वस्त करण्यात आल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई पोलिसांनी गेल्या साडेतीन वर्षांत तब्बल 136 कोटी रुपयांचा अमली पदार्थ साठा जप्त करून 2,396 जणांवर कारवाई केली आहे. याच मोहिमेअंतर्गत शांताबाई करंडेकर (वय 50) हिने सिडकोच्या भूखंडावर दुमजली अनधिकृत इमारत उभारून त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. तिच्याविरोधात यापूर्वी अमली पदार्थ विक्रीबाबत तीन आणि मारामारीचे चार असे सात वेगवेगळे गुन्हे दाखल असून, तिच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली होती.

यानंतर नवी मुंबई पोलीस आणि सिडको मंडळाने संयुक्तपणे कारवाईचे नियोजन करत बुधवारी दुपारच्या सुमारास या इमारतीवर बुलडोझर चालवला. कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. अनधिकृत बांधकामासह अमली पदार्थांचा अड्डाच उद्ध्वस्त करण्यात आला. अशा पद्धतीने नवी मुंबईत झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

या कारवाईतून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट संदेश दिला की, तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या तस्करांविरुद्ध अशाच कठोर कारवाया सुरू राहतील. तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे यांनी सिडकोच्या जागेवर बेकायदा कृत्य आणि अनधिकृत बांधकामांना कोणताही थारा दिला जाणार नाही, हे अधोरेखित केले.

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे आणि सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत राठोड यांच्या देखरेखीत ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

Exit mobile version