| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील नेरूळ परिसरात भंगार आडून अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यावर नवी मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी (दि.30) मोठी कारवाई केली आहे. नेरूळ सेक्टर 28 आणि सीवूड्स रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायाची पाळेमुळे खणून काढत पालिकेच्या पथकाने हे अनधिकृत दुकान जमीनदोस्त केले.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजू राठोड हा सध्या अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांखाली कारागृहात आहे. मात्र, त्याच्या पश्चात त्याची पत्नी त्याच भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार चालवत असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महापालिकेने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून अखेर या अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या कारवाई दरम्यान दुकानातील सर्व भंगार साहित्य जप्त केले आहे. या धडक कारवाईमुळे नेरूळ आणि सीवूड्स परिसरात बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या धंद्यांना जरब बसणार आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अशा संशयास्पद व्यवसायांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.







