अफकॉन्सच्या मनमानीवर संताप
| उरण | प्रतिनिधी |
विकासाच्या नावाखाली कंपन्यांची मनमानी किती वाढली आहे, त्याचे धक्कादायक उदाहरण करंजा सातघर येथे समोर आले आहे. शेतकऱ्याच्या घराशेजारी परवानगीशिवाय पुलाचे काम सुरू केल्याचा गंभीर आरोप अफकॉन्स कंपनीवर करण्यात आला आहे. या प्रकारामुळे 9 जणांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
करंजा सातघर येथील आशा कमळाकर थळी (घर क्र. 2344, सर्वे नं. 16) यांच्या घराशेजारी अफकॉन्स कंपनीकडून पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, घरमालकाची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्याने थळी कुटुंब धास्तावले आहे. या घरात एकूण 9 जणांचे कुटुंब वास्तव्यास असून पुलाच्या कामामुळे घराला तसेच कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात 11 मार्च रोजी आशा थळी यांनी उरण तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुलाच्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास काही धोका झाल्यास अफकॉन्स कंपनी, संबंधित अधिकारी, वन विभाग तसेच ग्रामपंचायत जबाबदार राहतील.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उरण तहसील कार्यालयाने मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकार अभिलेखांची तपासणी करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तसेच शासनाचे कायदे, नियम व प्रचलित धोरणांच्या आधारे सखोल चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निवासी नायब तहसीलदार महेश पाटील यांनी लेखी निर्देश दिले आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावरच बुलडोझर चालवण्याचा उद्योग थांबवावा, अशी जोरदार मागणी उरण तालुक्यातून होत आहे.







