। पनवेल । प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांवर सिडकोने धडक कारवाई करत बेकायदा ढाबे, पान टपर्या, चहा स्टॉल आणि ताडी-माडीच्या दुकानांवर बुलडोझर चालवला. आम्र मार्ग आणि विमानतळाच्या कंपाउंडदरम्यान उभारण्यात आलेली विविध कच्ची बांधकामे पूर्णपणे हटवण्यात आली. संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
आम्र मार्गालगतचा परिसर अतिक्रमणासाठी हॉटस्पॉट ठरत होता. यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नियोजनबद्ध मोहीम राबवत सर्व कच्ची बांधकामे निष्कासित केली. पान टपर्या, चहा स्टॉल, ताडी-माडीची दुकाने आणि इतर तात्पुरत्या संरचना जमीनदोस्त केल्या. विमानतळ परिसर हा उच्च सुरक्षा क्षेत्र असल्याने अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष दिले आहे. अनियंत्रित टपर्यांमुळे वाढणारी गर्दी आणि संभाव्य सुरक्षाधोका लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान साहित्य जप्त करण्यात आले. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मॅगडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणा विरोधातील मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार आहे. विशेषतः विमानतळ परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी नियमित कारवाया सुरूच राहणार असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई विमानतळ परिसरातील बेकायदा ढाबे-टपर्यांवर बुलडोझर
