| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे चौल, नागाव, रेवदंडा विभागीय चिटणीस सचिन राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागाव विभाग बैलगाडी, घोडागाडी मालक संघाच्या वतीने नागावमधील साताड बंदरामध्ये बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.02) एप्रिल रोजी दुपारी या स्पर्धेला सुरुवात झाली.
सचिन राऊळ पुरस्कृत या बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचे उद्घाटन नागावमधील माजी सरपंच नंदकुमार मयेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, संदेश नाईक, नागाव घोडागाडी, बैलगाडी संघटना कमिटीचे पदाधिकारी, सभासद, बैलगाडी हौशी, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत 25 गटांचा समावेश असून त्यात 23 बैलगाडी व दोन घोडागाडी गटांचा समावेश असल्याचे सचिन राऊळ यांनी सांगितले.