तळा तालुक्यात बैलगाडी झाली दुर्मिळ

| तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातून बैलगाडी हळूहळू दुर्मिळ होत चालली असून बैलगाडी आल्यावर घुंगराचा येणारा आवाजही हरवला असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पूर्वी बैलगाडीकडे सर्वच माल वाहतुकीसाठी एकमेव पर्याय म्हणून बघितले जायचे. सकाळी पहाटे पहाटे शेतकरी वर्ग बैलगाड्या घेऊन शेतावरती धंदा व्यवसाय करण्यासाठी ताफ्याने विभाग विभागातून निघत असत.त्यावेळी घुंगराच्या आवाजाने सकाळची वेळ आनंददायी होत असे. प्रदूषण नाही, ध्वनी प्रदूषण नाही की इंधन खर्च नाही अशी ही बैलगाडी होती. परंतु आता रिक्शा टेम्पो निघाले आहेत. ज्यांचे भाडेही कमी व कमी वेळात काम पूर्ण होते. त्यामुळे बैलगाडीचा कोणीही विचार करीत नाही. शिवाय शेती करणे हल्ली परवडत नसल्याने तालुक्यातील बहुतांश नागरिक शेती सोडून शहराकडे नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे बैलगाडी बाळगायची म्हणजे खर्चही परवडत नाही. केवल बोटावर मोजण्याइतक्याच शेतकर्‍यांकडे बैलगाडी पहायला मिळते. बाकी इतरांनी शेती करणे सोडून दिल्याने हळूहळू तालुक्यातील बैलगाडी दुर्मिळ होत चालली आहे.

Exit mobile version