कुंडलिकेच्या तिरी, पोलिसांची दादागिरी

अडव्हेंचरच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ
आदेशानुसार कारवाई; पोलिसांची माहिती

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सद्यःस्थितीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, रोहा व सुधागड तालुक्यात प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या आदेशाने कुंडलिका नदी किनार्‍यावरील अडव्हेंचर सेंटरवर कोलाड पोलीस जमावबंदीची नोटीस देण्यास गेले होते. मात्र, यावेळी कोलाड पोलिसांनी याठिकाणी उपस्थित पर्यटक व कर्मचार्‍यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याची माहिती येथील महिला कर्मचार्‍यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली.
144 च्या जमावबंदी सूचनेने येथील राफ्टिंग बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. साजे, ता. माणगाव येथील राफ्टिंग व्यवसायामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा या मुद्द्यावर वाद सुरू होता. त्याअनुषंगाने कोलाड येथील राफ्टिंग बंद ठेवण्यात आली होती. रविवारी अचानक कोलाडचे सहायक पोलीस निरीक्षक एस.ए. जाधव यांनी अडव्हेंचर सेंटरवर येऊन पर्यटक, महिला व पुरुष कर्मचार्‍यांना शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे महेश सानप यांनी सांगितले. पर्यटकांसमोर पोलिसांनी केलेली शिवीगाळ चुकीची असल्याची भावना श्री. सानप यांनी व्यक्त केली.

अप्रत्यक्ष कबुली
यासंदर्भात कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. जाधव यांनी सांगितले की, प्रांताधिकारी यांच्या 144 च्या जमावबंदी आदेशाने कुंडलिका नदी पात्रात राफ्टिंग करू नये असे आदेश देण्यात आलेत. त्यानुसार सूचाना देण्यासाठी गेलो होतो. शिवीगाळ केली या आरोपावर श्री. जाधव म्हणाले की, तेदेखील मला बोलले आहेत, म्हणून प्रत्युत्तर दिले, अशी अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली.

रायगडात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, नागरिकांना नदी तीरावर पोहण्यास अथवा जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान, कुंडलिका नदी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, दि. 6 ते 10 ऑगस्ट या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहोत.
विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, रोहा

Exit mobile version