एकदरामध्ये दळवींच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी

प्रचारासाठी गेलेल्या तरुण कार्यकर्त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग, मुरूड, रोहा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना प्रचारात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे शिंदे गटातील उमेदवार दळवी यांना अपयशाची भीती वाटू लागली आहे. शनिवारी सायंकाळी एकदरा येथे प्रचाराला गेलेल्या शेकापच्या तरुण कार्यकर्त्यांवर दळवींच्या कार्यकर्त्यांनी जिवघेणा हल्ला करीत प्रचाराला विरोध केला. प्रचारासाठी गेलेल्या तरुणांवर हल्ला करून दळवींच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे. संविधानालाही मानत नसल्याचे दळवींच्या कार्यकर्त्यांनी सांगत त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या प्रचारार्थ अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरु आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह महिला, तरुण कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचाराचा धडाकाला लावत आहे. चित्रलेखा पाटील यांना प्रचाराच्या दरम्यान मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उच्च शिक्षित व सर्वच क्षेत्रात काम करणार्‍या चित्रलेखा पाटील असल्याने मतदारांकडूनदेखील त्यांचे जंगी स्वागत होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी अवघे आठच दिवस शिल्लक राहिले आहेत. शेकापसह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा वेगही वाढू लागला आहे. चित्रलेखा पाटील यांना प्रचारात मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे आमदार दळवी यांना अपयशाची भीती निर्माण झाली आहे. चित्रलेखा पाटील यांचा प्रचार रोखण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने डाव सुरु केले असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, शनिवारी सायंकाळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारासाठी शेकापचे कार्यकर्ते एकदरा येथे गेले. त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्यादेखील सहभागी झाल्या होत्या. गावातील मतदारांकडून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, दळवी यांच्या काही कार्यकर्त्यांनी शेकापच्या तरुण कार्यकर्त्यांची अडवणूक केली. तुम्ही प्रचार का करता, असा सवाल उपस्थित करीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिला कार्यकर्त्यांवरदेखील हात टाकण्याचा प्रयत्न केला. कोयता व इतर साहित्य आणून त्यांना ठार मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. आम्ही संविधान मानत नाही, प्रचार करायचा नाही. चालते व्हा, अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून आले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचाराच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत. परंतु, एकदरा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलीस संबंधितांवर कारवाई करण्यास यशस्वी ठरतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रचार करणार्‍या तरुण कार्यकर्त्यांना सायबरची धमकी
सुज्ञ व सुशिक्षित महिला उमेदवार चित्रलेखा पाटील यांना विधानसभेत पाठविण्यासाठी तरुण कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत. गावागावातील अनेक तरुण मंडळी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. परंतु, याच तरुण कार्यकर्त्यांना सायबरची धमकी दळवींच्या बगलबच्चांकडून दिली जात असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. सायबरचे तुमच्यावर लक्ष आहे, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगून त्यांना त्रयस्त व्यक्तींमार्फत धमकी दिली जात आहे. या प्रकारामुळे दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. याकडे निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. परंतु, निवडणुकीच्या कालावधीत कोणी कोणाला धमकी देत असेल, हल्ला करीत असेल, त्यांनी स्थानिक पोलिसांबरोबरच थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधून माहिती द्यावी. संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड

चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा प्रचार करण्यासाठी एकदरा येथे आम्ही तरुण कार्यकर्ते महिला गेलो होते. गावातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु, महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी अडवणूक करून प्रचार करणे थांबविले. आमच्या अंगावर येऊन ठार मारण्याची धमकी दिली. गाडीदेखील फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आम्ही तेथून निघालो.

फिजा अब्दूल मकानदार,
तरुण

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारासाठी मुरूडमधील एकदरा येथे प्रचारासाठी गेलल्या कार्यकर्त्यांवर विशेष करून महिलांवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त करीत असून, संबंधितांविरोधात तीव्र कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विक्रांत वार्डे,
अध्यक्ष, शेकाप तालुका पुरोगामी आघाडी

Exit mobile version