| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलिसांनी बॉलीवुड चित्रपटासारखे बंटी आणि बबलीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, त्यांच्याकडून चार फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पियुष भोसले नावाच्या व्यक्तीने सोनार व्यावसायिक सुनिल बडगुजर यांना स्वस्त दरात सोने देतो, असे आमीष दाखविले. त्या बदल्यात रोखीने 10 लाख रुपये मंदिपकौर हिला देण्यास सांगितले. त्यानुसार सुनिल बडगुजर यांनी त्यांना रक्कम दिल्यानंतर पियुष भोसले व त्याची सहकारी महिला मंदिपकौर हे दोन्ही आरोपी पसार झाले होते. सुनील बडगुजर यांना त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी माहिती काढल्यानंतर एप्रिल मध्येच मंदिपकौर ही सापडली. तेव्हा तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. मात्र, तिने पियुष भोसले याला पोलीस आपला शोध घेत असल्याचे सांगितले आणि दोघेही पनवेल मधून फरार झाले. त्यांनतर त्यांचा अधिक तपास केल्यानंतर ते डोंबिवली येथील प्रतिष्ठीत सोसायटी लोढा पलावा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीने दोन्ही आरोपींचा त्या ठिकाणी जाऊन शोध घेतल्यानंतर दोन्ही आरोपी सापडले आणि त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या अधिक तपासात दोन्ही आरोपींचा पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा, तर पियुषचा पनवेल शहर पोलीस ठाण्यात एन.एम.एम.टी कर्मचारीस मारहाण प्रकरणी आणि सीबीडी, बेलापुर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.






