उरण पोलिसांची दमदार कामगिरी
| चिरनेर | प्रतिनिधी |
राज्यातील विविध जिल्ह्यांत 22 ठिकाणी घरफोड्यांसह चोऱ्या करणाऱ्या आधुनिक बबली बंटीला उरण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. नवनीत नाईक (45) व स्मिता नाईक (41) अशी या दाम्पत्याची नावे आहेत.
उरणमधील दादरपाडा येथील रहिवासी राजु झुगरे (44) यांच्या घराची रेकी नवनीत नाईक आणि स्मिता झुगरे यांनी रेकी केली होती. ते देखील त्याच गावात भाड्याने राहत होते. 8 ऑगस्ट रोजी राजु झुगरे हे दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्याचाच फायदा घेत नवनीत नाईक व स्मिता नाईक यांनी बनावट चावीने कुलूप खोलले. त्यानंतर दरवाजा उघडून बेडरूमच्या वार्डरुफमध्ये ठेवण्यात आलेले दागिने व रोख रक्कम असे एकूण 13 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. त्यानंतर रातु झुगरे घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेचच उरण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यासह सहा पोलिसांचे पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. घरफोडी केल्यापासूनच आरोपी पती-पत्नी गावातुन गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी प्रथम नाईक दांपत्याचे मोबाईल नंबर शोधून काढले. त्यानंतर तांत्रिक व गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज तपासात घरफोडी करून नाईक पती-पत्नी पालघरमधील उमरोली पालघर येथे लपून बसल्याचे उघडकीस आले. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले. तपासाअंती आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे सर्व दागदागिने हस्तगत करण्यात आले. अधिक तपास केला असता या बंटी-बबलींवर राज्यातील विविध जिल्ह्यांतील ठिकाणी अशाच प्रकारचे एकुण 22 गुन्हे दाखल असून यापैकी नवीमुंबई, रायगड व कोल्हापूर येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. काही गुन्ह्यांमध्ये या दोघांनी शिक्षाही भोगली आहे. दरम्यान, न्यायालयाने या आधुनिक बंटी-बबलीला 9 दिवसांच्या पोलीस रिमांडनंतर सोमवारी (दि.24) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशी माहिती तपास अधिकारी संजय राठोड यांनी दिली आहे.
