नागावच्या पुरातन भीमेश्वर मंदिरात चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव येथील पुरातन भीमेश्वर मंदिरात सोमवारी (दि.9) चोरट्यांनी चोरी केली. मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. तसेच मंदिरातील दानपेटी चोरुन नेली. हा सारा प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीत कैदा झाला असून याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागावमधील भीमेश्वर मंदिर हे पुरातन आहे. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. या मंदिराचे अलिकडेच सुशोभिकरण करण्यात आले. तसेच सुरक्षेच्यादृष्टिने सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले आहेत. या मंदिरातील पुजारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी घरी गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते परत मंदिरात आले. त्यावेळी मंदिरातील दानपेटी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंदिरात चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. ठिकठिकाणी शोधाशोध सुरु झाली.

या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिराच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीद्वारे पाहणी केली. त्यावेळी दोन संशयित त्यांना दिसून आले. त्यात एक अल्पवयीन मुलगा असून पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र इंगळे तपास करीत आहेत.

दर्शनाच्या निमित्ताने केला मंदिरात प्रवेश
एका अल्पवयीन मुलाच्या समवेत संशयित चोरटा देवदर्शनाच्या निमित्ताने मंदिरात घुसला. मंदिरात देवाचे दर्शन घेऊन आजूबाजूला फिरत राहिला. त्यानंतर एका बाजूला बसला. पंधरा ते वीस मिनीटे हा प्रकार सुरु होता. त्यानंतर मंदिरात कोणी येत नसल्याचा अंदाज घेत त्याने आतील दानपेटी गायब करीत तेथून पळ काढला.
Exit mobile version