| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील चौल येथील दत्त मंदिरातील चांदीच्या प्रभावलीची चोरी होवून सुमारे पाच महिने उलटून चोरांचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या रायगड पोलिस दलाला चोरट्यांनी आव्हान देत खंडेरावपाडा थेरोंडा येथील खंडोबा मंदिरात चोरी करीत चक्क देवाच्या मूर्तीचीच चोरी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

चौल येथील दत्त मंदिरात चाळीस किलो चांदीच्या प्रभावळीची चोरी दि. 15 डिसेंबर रोजी मध्यरात्री झाली. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेजसुध्दा उपलब्ध होते. परंतु, अद्यापपर्यंत चोरीचा तपास पोलिसांकडून लागलेला नाही. यासाठी ग्रामस्थानी रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्त मंदिरात महाआरती आंदोलन देखील केले. मात्र त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. या घटनेला पाच महिने उलटून गेले असताना मध्यरात्री खंडेरावपाडा थेरोंडा येथील खंडोबा मंदिरात चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी करीत मंदिरातील नऊ मुर्त्या पळवून नेल्या आहेत. या घटनेमुळे परिसरासह संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे.