१ लाख ७६ हजाराचा ऐवज लंपास
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून रात्रभर पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत चोरटयांनी पेणमधील उत्कर्षनगर येथील भाग्यश्री रेसिडेन्सी मधील फ्लॅटचा लॉक तोडून सोन्या-चांदीचे दागिने मिळून जवळ जवळ 1 लाख 76 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. पेण मध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू आहे.

याबाबत माहिती अशी कि, मनिष रमेश म्हात्रे (वय 27) रा. भाग्यश्री रेसिडेन्सी, उत्कर्षनगर पेण हे रविवारी बाहेर गेले होते. त्याचा फायदा घेत यांच्या फ्लॅटचा दरवाजा चोरटयांनी हत्याराने कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील एकूण 1 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेले.

चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटयांनी इतरही फ्लॅटमध्येही घरफोडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असून पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे अधिक तपास करीत आहेत.
