आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून घरफोडीने धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे, दक्षिण रायगड जिल्ह्यात या घटना घडत होत्या. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात रायगडमधील सात गुन्ह्यांचा समावेश आहे. यात 15 लाख 50 हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींविरोधात तब्बल 23 गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांमध्ये दिवसा घरफोडीचे प्रकार घडले होते. आलिशान कारचा वापर करून गृहनिर्माण सोसायटीमध्ये घुसून घरांमधील कुलूप तोडून दागदागिने आणि रोख रक्कम लंपास करीत होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे हा तपास वर्ग केला. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, मानसिंग पाटील, उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, पोलीस हवालदार अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, रवींद्र मुंढे, अक्षय पाटील, सचिन वावेकर, अक्षय जाधव, सुदीप पहेलकर, महिला पोलीस हवालदार रेखा म्हात्रे, पोलीस शिपाई अक्षय जगताप, मोरेश्वर ओमले, लालासो वाघमोडे, बाबासो पिंगळे, ओंकार सोंडकर, तसेच रोहा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत लोहार आदींची तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या पथकांमार्फत आरोपींचा शोध घेण्यात आला. जिल्ह्याबाहेरील पोलिसांसोबत संपर्क साधून गुन्हेगारांचा शोध युद्धपातळीवर सुरु करण्यात आला. तीन ऑगस्टला एक सफेद रंगाची कार घेऊन आरोपी माणगाव परिसरात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, श्रीवर्धन, म्हसळा पासून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र, त्यातूनही त्यांनी पळ काढला. अखेर तपासाची सूत्रं वेगाने हालविण्यात आली. रायगडसह सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजची तपासणी करण्यात आली. अखेर शाहनवाज नावाचा मुख्य आरोपी राहात असल्याची माहिती उपलब्ध झाली. तो उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी केली अशी रेकी
आरोपीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, रवींद्र मुंढे, अक्षय पाटील, सचिन वावेकर, अक्षय जाधव, महिला पोलीस हवालदार रेखा म्हात्रे यांची दोन पथके तयार करण्यात आली. ही पथके सिकंदराबाद येथे पाठविण्यात आली. या पथकाने एक महिनाभर वेगवेगळे वेशांतर करीत आरोपीच्या ठावठिकाणांची माहिती घेतली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात खुनाचे दोन, खुनाचा प्रयत्न केल्याचे चार, शस्त्र बाळगणे, पोलिसांवर गोळीबार करणे अशा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाच अधिकारी, 40 कर्मचाऱ्यांद्वारे त्याला चौधरीवाडा येथून ताब्यात घेतले. त्याने रायगडसह रत्नागिरी, सातारा येथील घरफोडीचे गुन्हे कबूल केले. या गुन्ह्यात शहानवाजसह शमीम कुरेशी, हिना कुरेशी या तिघांना अटक केली आहे.
त्याच्या पत्नीचाही गुन्ह्यात समावेश
तपास करीत असताना शहानवाज याच्या हालचालीवरून काही संशय निर्माण झाला. त्यानुसार त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. तपासानंतर असे निष्पन्न झाले की, शहानवाज गुन्ह्यातील मुद्देमाल त्याच्या पत्नीकडे देत असत. त्याची पत्नी त्याची विल्हेवाट लावत असत. त्यामुळे तिचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
आजारीपणाचे नाटक करून थकवत होता पोलिसांना
शाहनवाज हा सराईत गुन्हेगार असून, तो आजारी असल्याचे नाटक करून स्वतःला दुखापत करून पोलिसांना वेठीस धरीत असत. पोलिसांवर वेगवेगळे आरोप करून मुद्देमाल जप्त करण्यास देत नव्हता. जामिनावर सुटल्यावर सोशल मीडियावर त्याचा प्रचार करतो. त्याचे समर्थक सिकंदराबाद येथे राहत्या घरी मिरवणूक काढून सत्कार करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहानवाजच्या या प्रकाराची माहिती रायगड पोलिसांना होती. त्यांनी मोठ्या कौशल्याने त्याच्याकडून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.







